आयसीएएस अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांच्याशी पुण्यात संवाद साधण्याची संधी
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नेमका कसा दृष्टिकोन हवा, अभ्यासाची तयारी कशी करायची, स्पर्धा परीक्षेतील मोठी आव्हाने कोणती आणि मुख्य म्हणजे परीक्षेतील यशानंतर सनदी अधिकारी म्हणून काय आव्हाने असतात या सगळ्याविषयी एका नागरी सेवेतील अधिकारी व्यक्तीकडूनच जाणून घ्यायची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या पुढच्या पर्वातून मिळणार आहे. देशाच्या अर्थमंत्रालयाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या धडाडीच्या अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांच्याशी या संदर्भात संवाद साधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. १५ एप्रिल) पुण्यात होणार आहे.
विविध क्षेत्रांत नेटाने काम करणाऱ्या यशस्विनींना केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या मंचावर आमंत्रित करण्यात येते आणि त्यांच्याशी मुक्त संवादाचा हा कार्यक्रम असतो. या उपक्रमाअंतर्गत भारतीय नागरी लेखा सेवेत अधिकारी (आयसीएएस)असणाऱ्या सुप्रिया देवस्थळी यांच्याशी गप्पांचा हा कार्यक्रम होईल. सुप्रिया देवस्थळी २०११ पासून भारतीय नागरी लेखा सेवेत असून केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर मंडळाच्या लेखा निबंधक (कंट्रोलर ऑफ अकाऊंट्स) या पदावर त्या सध्या मुंबईत कार्यरत आहेत. सर्वात अधिक महसूल उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांच्या अधिदान आणि लेखा कार्यालयाची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे. या राज्यांचा महसूल आणि खर्च यांच्यावर देखरेख ठेवायची जबाबदारी त्या सांभाळताहेत. यापूर्वी फॉरवर्ड मार्केट कमिशनच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयाची सुवर्णपदकासह पदवी मिळवल्यानंतर त्यांनी उपयोजित मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्या सेवेत रुजू झाल्या. सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देऊन त्यात यश मिळवले आणि भारतीय नागरी लेखा सेवेसाठी त्यांची निवड झाली. नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्या आवडीने करतात.
केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल. विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर कार्यक्रमस्थळी मिळतील.
- कुठे : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे.
- कधी : शनिवार, १५ एप्रिल २०१७
- वेळ : सायंकाळी ५.३०