Physical Abuse in Mumbai Local : मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ट्वीट करत यावर भाष्य केलं.
सुप्रिया सुळे म्हणाले, “संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे.”
“महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी परीक्षा देण्यासाठी बेलापूरच्या दिशेने जात होती. बुधवारी (१४ जून) सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती. लैंगिक अत्याचारानंतर पीडितेने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आरोपीने पळ काढला.
घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता मस्जिद स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये आरोपीची ओळख पटली.
हेही वाचा : मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपी नवाझु करीमला अटक
दरम्यान, घटनेच्या आठ तासांनंतर आता आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आली आहे.