विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत नार्वेकरांवर सातत्याने दिरंगाईचा आरोप होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत ताशेरे ओढले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांमध्ये गुप्तबैठकीची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्तभेट झाली असेल, तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने तिखट शब्दात महाराष्ट्र सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत. असं असताना ही गुप्तबैठक झाली असेल, तर ते संविधानाच्या विरोधात आहे.”
“खासदारकी रद्द करताना २४ तासात निर्णय, मात्र परत करताना…”
खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मु्द्द्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या, “मी ओम बिर्ला यांच्या कार्यालयात फोन केला आहे. मी सातत्याने फैजल यांच्या खासदारकीचा पाठपुरावा करत आहे. कारण फैजल हे लोकप्रतिनिधी आहेत. दरवेळी एखादी घटना घडली की, तत्काळ २४ तासात खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, खासदारकी परत देण्याची वेळ येते तेव्हा दरवेळी आम्हाला न्यायालयात जावं लागतं.”
हेही वाचा : “अध्यक्षांना आता आयसीयूत जाण्याची वेळ आली”; संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकर म्हणाले…
“लोकसभा अध्यक्ष कुणा एका पक्षाचे नसतात”
“राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली तेव्हाही तसंच झालं. फैजल यांचंही तसंच झालं. ओम बिर्ला आमचे कस्टोडियन आहेत. जेव्हा लोकसभा अध्यक्ष होतात तेव्हा ते कुणा एका पक्षाचे नसतात. ते लोकसभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे माझी ओम बिर्ला यांना विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर फैजल यांना त्यांच्या खासदारकीची जबाबदारी द्यावी,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.