राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. भाजपाने या बंदला विरोध केल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी एकेकाळी राजकारणात असलेली माणूसकी केंद्रातील सरकारने संपवली आहे, असा घणाघाती आरोप केला. तसेच मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचा खून केला. तो व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात, तळपायाची आग मस्तकात जाते, असं मत व्यक्त केलं. शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही, असं म्हणत त्यांनी भाजपाला फटकारलं. त्या मुंबईत महाराष्ट्र बंद निमित्त आयोजित आंदोलनात माध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लखीमपूरमध्ये हत्याकांड आणि देशभरात अन्नदात्याविरोधात जो अन्याय होतोय त्याविरोधात महाराष्ट्रात हा बंद पुकारला आहे. दुर्दैव आहे की राजकारणात माणूसकी राहिलेली नाही. एकेकाळी राजकारणात माणूसकी होती, पण केंद्रात असलेल्या सरकारने ती संपवली आहे. हा बंद मंत्र्याच्या मुलाने ज्या लोकांचा खून केला त्याविरोधात आहे. आजही तो व्हिडीओ बघितला की अंगावर शहारे येतात. तळपायाची आग मस्तकात जाते. इतका क्रूरपणा तुम्ही कधी पाहिलाय का? ही क्रूर घटना आहे आणि त्यावर केवळ जाहीर निषेध करून संपणार नाही, तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला अटक होण्यासाठी इतका वेळ लागला. केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला पाहिजे.”
“केंद्रात मुघलांचं सरकार, त्यांच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान दिसत नाही”
अनिल देशमुख यांच्या सुनेविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. “केंद्र सरकार मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात कधी कोणी महिलांवर हात उचलला नाही. छत्रपतींनी महिलांचा नेहमी मानसन्मानच केलाय. या मोघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचाराचा इतिहास आपल्या देशाने पाहिलाय. हे मुघलांचं राज्य सुरू आहे आणि त्यांच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान दिसत नाही. त्यांना वाटतं या देशातील महिला आबला आहे. ‘उन्होने घी देखा है, बडगा नही देखा’. याच महाराष्ट्रातील मुली मग ती सावित्री असो की अहिल्याबाई असो, की राणी लक्ष्मीबाई असो, त्यांचं कर्तुत्व केंद्र सरकार विसरलं आहे. त्यामुळे ते सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या लेकी यांच्या अत्याचारासमोर उभ्या राहतील, कारण या जिजाऊच्या लेकी आहेत,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
“शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. तुम्ही तो शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ पाहा, तुम्हाला त्यात माणूसकी दिसते आहे का? पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. हे चुकीचं आहे, क्रुरता आहे हे तुम्हाला वाटत नाही का? कुणाचंही सरकार असो उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय द्यावा.”
हेही वाचा : Maharashtra Bandh: हे तर भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन; जयंत पाटील संतापले
“मुंबईत नेमकं कोण बस फोडतंय याची माहिती काढावी लागेल”
“मुंबईत नेमकं कोण बस फोडतंय याची माहिती काढावी लागेल. चुकीच्या बातम्या जावू नये म्हणून माध्यमांनीही काळजी घ्यावी. कारण आम्हीच आमच्या बसेस का फोडू हा तुम्ही विचार करा. कोणीतरी फोडतंय म्हणजे चुकीचं काम करतंय,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी तोडफोडीचा निषेध करत चौकशीचा इशारा दिलाय.