कथित १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या वर्षभरापासून अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यांना १० दिवस कारागृहात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, आज अनिल देशमुख यांची सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“केंद्र सरकार आणि राज्यातील ‘ईडी’ सरकार विरोधात जो कोणी बोलतो, त्याला केंद्रीय तपास यंत्रणांची भिती दाखवली जाते. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येते. छगन भुजबळ असेल, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, अशी अनेक प्रकरणं गेल्या काही दिवसांत पुढे आली आहे. अनिल देशमुखांना एक-दीड वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आले. या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांची मनस्थिती होती काय होती? हे मी जवळून बघितलं आहे. त्याला जबाबदार कोण आहे?” अशी प्रतक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
हेही वाचा – अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर, समर्थकांचा जल्लोष
“अनिल देशमुखांना जामीन देताना, त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. १०९ वेळा त्यांच्या घरावर छापे टाकूनही ईडीला काहीही मिळालेलं नाही. खरं तर हा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल, अशाप्रकारे १०९ वेळा कोणाच्याही कुटुंबावर छापे पडले नसतील. त्यांच्या संबंधित लोकांच्या घरावरही छापा टाकण्यात आला, तिथेही काहीच मिळालं नाही. मात्र, बदला घेण्याच्या हेतूने जो प्रकार केंद्र सरकारने केला आहे, तो दुर्देवी आहे”, असेही त्या म्हणाले.