मुंबई: आमच्यावर जी टीका करायची असेल ती करा, पण आमच्या आई-वडिलांबद्दल बोलू नका, असा इशारा राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.
वय झाल्याने शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, अशी टीका अजित पवार यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्योगपती रतन टाटा या वयातही काम करतात. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ८० व्या वर्षी जाहिरातीत आणि मोठय़ा पडद्यावर दिसतात. सीरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पूनावाला अद्यापही काम करीत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी ही वयस्कर मंडळी आपले योगदान देत आहेत. वडीलधाऱ्यांना थांबायला सांगणाऱ्या मुलांपेक्षा आम्ही मुली चांगल्या आहोत.
लहानसहान कारणांमुळे टचकन डोळय़ात पाणी येते, पण संघर्षांची वेळ येते, तेव्हा पदर खोचून तीच महिला जिजाऊ होते. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर भाजपच्या प्रवृत्तीविरोधात आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
आमदार देवेंद्र भुयार यांचे घूमजाव
आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेऊन पाठिंबा दिल्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार भुयार यशवंतराव चव्हाण केंद्रात उपस्थित राहिले. त्यानंतर भुयार हे अजित पवारांकडे गेले व पाठिंबा दिला. भुयार हे अपक्ष आहेत.
शरद पवार त्यांना नकोसे! जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मुंबई: शरद पवार त्यांना नकोसे झाले आहेत. काळ आणि वेळ ज्यांच्याकडे नाही, त्यांना घराबाहेर काढण्यासाठी घाई चालली आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तुम्हाला निवडून आणण्यासाठी शरद पवार हे वणवण फिरले. असाध्य रोगाचा सामना करत त्यांनी तुम्हाला निवडूूून आणले. तुम्हाला त्याचे काहीच वाटत नाही, असे आव्हाड यांनी बंडखोर आमदारांना सुनावले. मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे. निष्ठा नावाची काही गोष्ट असते की नाही. लोकशाहीचा गळा घोटला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता? असा सवाल जेव्हा पुढची पिढी विचारणा करेल. तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार. तुम्ही फक्त काय मुख्यमंत्री होण्यासाठी जन्म घेतला आहे का? असा प्रश्न आव्हाड यांनी अजित पवार यांचे नाव न घेता विचारला आहे.नारळ कोणावरही फोडावा लागतो म्हणून मला दोषी ठरवावे लागते, असेही आव्हाड म्हणाले. अजित पवार यांनी आव्हाड यांच्यावर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.