गेल्या पंधरा दिवसात मुंबईत महिला अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. मरिन ड्राईव्ह येथील वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. तसंच, दोन दिवसांपूर्वी मस्जिद ते सीएसएमटी स्थानकादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उजेडात आला. या दोन घटनांवरून राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल आहे. यावेळी त्यांनी महिला कुस्तीपटूंचाही मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारलाही धारेवर धरले. आज त्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहेत. दादाही महिला सुरक्षेबाबत सकाळी सविस्तर बोलले. दिल्लीमध्ये ऑलिम्पिक विजेत्यांचीही केंद्राने ज्या पद्धतीने केस हाताळली हा पहिला मुद्दा. मरिन ड्राईव्हला जे प्रकरण झालं तिचे पालक भेटले. त्यांनीही काही मागण्या केल्या आहेत. त्याचं फॉलोअप पोलिसांकडून घेतलं आहे. महाराष्ट्र सरकारलाही याबाबत विनंती करणार आहे. महिलांच्या विरोधात घटना होत आहेत, त्या वाढत जात आहेत. याला महाराष्ट्राचं गृहखातं जबाबदार आहे असं मला डेटामधून दिसतंय”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा >> “अजित पवारांनी ‘ती’ यादी लवकरच जाहीर करावी”, संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “आमच्याकडेही…!”

लोकशाहीपासून राज्य दूर चाललंय

“एक-एका मंत्र्याकडे दहा पंधरा खाती आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेत नगरसेवक नाहीत. मग महाराष्ट्र चालवतंय कोण? कोणी सुपरमॅन नाहीयेत या जगात. एक आयुक्त संपूर्ण शहर चालवतोय. एवढ्या नगरसेवकाचं काम एकच माणूस करतोय. जिल्हा परिषदेची जबाबदारी एकाच माणसावर आहे. येथे व्यवस्थापन अशक्य आहे. सातत्याने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणं म्हणजे लोकशाहीपासून दूर राज्य चाललंय हे दिसतंय”, अशीही टीका सुळेंनी केली.

…तर त्यांना आमचे नंबर द्या

दरम्यान, शिंदे गटाच्या कथित वेलविशरकडून काही दिवसांपूर्वी सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा पाढा वाचणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जाहिरातीवरून वादळ उठल्यानंतर या जाहिराती आमच्या हितचिंतकाने दिल्या असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली होती. यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. “या जाहिरातीचे वेलविशर कोण आहेत, याचा आम्ही शोध घेतोय. दादालाही मी याचा शोध घ्यायला सांगितला आहे. दादा आता जळगावला गेला आहे, तिथे त्याला सांगितलं बघ तिकडे तरी आहे का वेलविशर. मी काल पुण्यात होते. तिथेही शोधला. आज बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेय. आजची मिटिंग झाली की हा वेलविशर कोण आहे ते शोधणार आहे. असे वेलविशर आपल्या पक्षालाही मिळाले पाहिजेत. माध्यमांना फूल पेज जाहिराती मिळाल्या तर तुमचं आणि आमचं दोघांचंही भलं होईल. असे वेलविशर कोणी असतील तर त्यांना माझा, जयंत पाटील किंवा अजित दादांचा नंबर द्या”, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule lashes out at government in mumbai women abuse case said home department of maharashtra sgk
Show comments