मुंबई : अध्यक्षपदाच्या राजीनामानाटय़ातून सावरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘भाकरी फिरवण्याच्या’ मालिकेतील निर्णायक अंक शनिवारी रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली. त्यातून पवार यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याबाबत स्पष्ट सूतोवाच केल्याने आता अजित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली. या वेळी अजित पवार हेही उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार तडक निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ‘‘नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. पक्षाने टाकलेला विश्वास हे पदाधिकारी सार्थ ठरवतील’’, असे ट्वीट अजित पवार यांनी नंतर केले.
शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली तेव्हाच सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांनी तशी जाहीरपणे मागणी केली होती. पवारांनी राजीनामा मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करून पवारांनी सुप्रिया सुळे याच आपल्या राजकीय उत्तराधिकारी असतील, असे स्पष्ट संकेत दिले.
अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. अजितदादा आपल्या काही समर्थक आमदारांसह भाजपबरोबर जाणार असल्याच्या वावडय़ा उठत होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची केलेली घोषणा आणि राजीनामा मागे घेऊन अजित पवार यांना खिंडीत गाठल्याचे मानले जाते. पक्षावर आपलीच हुकूमत चालेल, असा स्पष्ट संदेश पवारांनी पुतण्याला दिला होता. अजित पवार की, सुप्रिया सुळे यापैकी पवारांचा राजकीय उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा नेहमीच रंगते. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवून पवारांनी स्पष्ट संदेश दिला आहे.
राष्ट्रवादीच्या राज्याच्या राजकारणात मुक्तवाव मिळावा, अशी अजित पवार यांची इच्छा लपून राहिलेली नाही. ‘नेत्यांचा फक्त आशीर्वाद घ्यायचा, निर्णय आपणच घ्यायचे’, असे विधान काही वर्षांपूर्वी अजित पवार यांनी केले होते. त्यावर पक्षाचे निर्णय आपल्या संमतीनेच होतील, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी काही काळानंतर दिले होते. सुप्रिया सुळे यांची राज्याच्या प्रभारीपदी निवड करण्यात आल्याने पक्षांतर्गत कारभारात आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांचा निर्णय अंतिम असेल. हे अजित पवार यांना कितपत मान्य होईल, याकडे राजकीय जाणकारांनी लक्ष वेधले आहे. काहीही झाले तरीही राष्ट्रवादी सोडणार नाही, असे अजित पवार यांनी मध्यंतरी जाहीर केले असले तरी पक्षात कोंडी होणार असल्यास ते कितपत जुळवून घेतील याबाबत साशंकता आहे.
सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पंख छाटल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांकडूनच व्यक्त करण्यात येते. या घडामोडी लक्षात घेता अजित पवार शांत बसणार नाहीत, असे मानले जाते. अजित पवार यांचे २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीच्या वेळचे बंड फसले होते. यामुळेच त्यांच्या पुढील राजकीय हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे बारीक लक्ष आहे.
अजितदादांच्या जखमेवर मीठ चोळले..
राज्य राष्ट्रवादीत सध्या अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद अजितदादांकडे गेल्यापासून जयंत पाटील अस्वस्थ आहेत. अजित पवारांनी जयंत पाटील यांची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा शरद पवारांचा कल जयंत पाटील यांच्याकडे होता. सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपद निवड झाल्यावर आगामी काळात त्यांच्या सल्ल्यानेच राज्याचा कारभार केला जाईल, असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगून एक प्रकारे अजित पवार यांच्या जखमेवर मीठच चोळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. राज्याचा कारभारा यापुढे अजित पवार नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्या सल्ल्याने होईल हे जयंत पाटील यांनी अधोरेखित केले.
खासदार प्रफुलभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. पक्षाने टाकलेला विश्वास हे पदाधिकारी सार्थ ठरवतील, असा विश्वास आहे.
-अजित पवार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र, विधानसभा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अजित पवार यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. शिवाय, त्यांच्याकडे आधीच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद असल्याने त्यांना नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही.