देशात अनेक राजकीय नेते कोणत्याही सुरक्षेविना वर्षांनुवर्षे सक्रिय राजकारणात आपला ठसा उमटवत आहेत. अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना तुम्ही कधी सुरक्षेच्या गराडय़ात पाहिले आहे का, असा सवाल करत ‘तुम्हाला मात्र आपचेच कौतुक’ असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी ठाण्यात लगावला.
महाराष्ट्रात सुमारे दीड लाख पोलिसांची भरती झाली. तरीही भ्रष्टाचाराविषयी साधा ‘ब्र’देखील कोणी उच्चारला नाही. आम आदमी पक्षाचे नेते सुरक्षा घेत नाहीत त्याची चर्चा होते, मग भ्रष्टाचारविरहित पोलीस भरतीचे कौतुक का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र पोलिसांच्या ‘रेझिंग दिना’निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित महिला सुरक्षा या विशेष कार्यक्रमानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कौतुक करत ‘आप’ पक्षालादेखील टोला लगावला. देशभरात फिरत असताना सर्वात जास्त सुरक्षितता महाराष्ट्रात वाटते आहे. येथील पोलिसांनी राबवलेल्या चोख बंदोबस्तामुळेच हे शक्य झाले आहे.
पोलिसांनी राबवलेल्या योजनेमुळे मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना चाप बसला. राजकीय नेत्याचा मुलगा असो किंवा उद्योजक, अधिकारी कोणाचीही भीड न बाळगता प्रत्येकावर ही कारवाई केल्यामुळे महाराष्ट्राची ही योजना यशस्वी झाली. रस्ते अपघातामध्ये होणारी जीवितहानी यामुळे मोठय़ा प्रमाणात घटली, असे त्या म्हणाल्या.
गुन्हेगारी बातम्यांच्या सततच्या प्रसारणामुळे त्याचा अतिरेक होत आहे. या बातम्यांचा सततचा मारा करून मुलांच्या मनावर वाईट गोष्टी बिंबवू नये. राज्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी महिला भीती दूर करून गुन्हे नोंदविण्यासाठी पुढे येत असल्याच्या गोष्टीचे कौतुक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा