गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानेच गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी तीव्र नापसंती व्यक्त केली. विशेष म्हणजे गुटखाबंदी अंमलात आणण्याची जबाबदारी असलेली गृह आणि अन्न व औषधी प्रशासन ही दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.
गुटखा विरोधात जनजागृती करणाऱ्या संस्थांच्या सत्कार समारंभात सुप्रियाताईंनी सरकारला झटका दिला तर अजित पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची विकेट काढली. राज्य सरकारने गुटखाबंदी लागू केली असली तरी सर्रासपणे गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणले. बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या वर्षी एक वर्षांसाठी गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता कायमस्वरूपी घालण्यात येणार असल्याचे अजितदादांनी जाहीर केले.
पुरस्कार मिळालेल्या संस्थेत एक संस्था ही सांगली जिल्ह्य़ातील होती. याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले, सांगली जिल्हा तंबाखूमुक्त झाल्यास या जिल्ह्य़ातील जनता सांगेल ती कामे करण्याची आमची तयारी आहे. अजितदादांचा हा टोला अर्थातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांना उद्देशून होता.
गुटख्यावर बंदी घालण्यात आली असली तरी काही हितसंबंधिय व्यापारी सरकारवर दबाव आणून ती उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सरकार गुटखाबंदीवर ठाम असल्याचेही पवार यांनी सांगितले.