करोना काळात मुंबई महापालिकेत खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठाकरे गटातील सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना समन्स बजावलं होतं. २५ नोव्हेंबर रोजी दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही याप्रकरणी चौकशा आणि तपास चालू होता. दरम्यान, ईडीने आज (१७ जानेवारी) रात्री सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ही अटक म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण दोघेही ठाकरे गटात आहेत. खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी १ सप्टेंबर २०२३ रोजी फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्व्हिसेसचे भागिदार आणि कर्मचारी, स्नेहा केटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी आणि संबंधित खासगी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होते. याप्रकरणी ६.३६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

हे ही वाचा >> धारावीकरांना ३५० चौरस फुटाच्या घराची शासनाकडूनच तरतूद! १७ टक्के जादा क्षेत्रफळाचा दावा फसवा

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखादेखील तपास करत आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर यांच्यासह सहा जणांविरोधात आधीच याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan close to aaditya thackeray arrested by ed in bmc khichdi covid scam case asc