मुंबई: युवा सेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी सुमारे पाच तास चौकशी केली. करोना केंद्र गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेसह सक्तवसुली संचालनालयही (ईडी) तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाण यांची चौकशी केली.
सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने दिलेली कंत्राट चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यात युवा सेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ईडीला उपनगरात खरेदी करण्यात आलेल्या चार ते पाच सदनिकांची माहिती मिळाली आहे. त्यांची किंमत १० ते १२ कोटी रुपये असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कंत्राटांबाबत तसेच मालमत्ता व इतर व्यवहारांची ईडीकडे माहिती असून त्याबाबत चौकशीसाठी चव्हाण यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी ईडीला या प्रकरणातील आणखी काही गैरव्यवहारांबाबतची माहिती मिळाली होती. त्याबाबत ईडीकडून आर्थिक गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली होती.