अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेल्या सूरज पांचोलीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यात असून या क्षणी जर सूरज जामिनावर बाहेर पडला, तर त्याच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने सूरजचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सूरजला गेल्या १० जून रोजी अटक करण्यात आली होती. परंतु तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर लगेचच सूरजने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पोलीस कोठडीचाच मुद्दा सूरजच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांकडून प्रामुख्याने मांडण्यात आला. सूरजची अवघी तीन दिवसांचीच पोलीस कोठडी मिळाल्याने आपण त्याची आवश्यक ती चौकशी करू शकलेलो नाही, असा दावा पोलिसांनी केला. शिवाय आत्महत्या करण्यापूर्वी जियाला शेवटचा फोन सूरजनेच केला होता. त्या दोघांचे आठ मिनिटांचे संभाषण झाले होते. तर आत्महत्या करण्याच्या पाच मिनिटे आधीपर्यंत सूरज तिला ‘मेसेज’ पाठवत होता. त्याने तिला सहा ‘मेसेज’ पाठविले होते आणि बहुतांशी ‘मेसेज’ असभ्य भाषेत होते. त्यावरून त्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे सिद्ध होते, असा दावाही पोलिसांकडून करण्यात आला.
दरम्यान, जियाची आई सूड उगविण्यासाठी आपल्याविरुद्ध आरोप करीत असल्याचा दावा सूरजच्या वतीने करण्यात आला. जियाच्या आत्महत्येनंतर चार दिवसांनी सापडलेल्या तिच्या पत्रांचा गैरवापर करून ती आपल्याला गोवत असल्याचाही आरोपही सूरजतर्फे करण्यात आला. अखेरच्या पत्रामध्ये जियाने तिच्या स्थितीसाठी सूरजला जबाबदार ठरविल्याचा दावा पोलिसांनी करीत सूरजचा जामीन फेटाळून लावण्याची मागणी केली. जामीन अर्ज फेटाळल्याने सूरज आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

Story img Loader