“अभिनेत्री जिया खानसोबत झालेल्या अखेरच्या भांडणाविषयी अभिनेता सूरज पांचोली काहीच सांगण्यास इच्छुक नव्हता.”, अशी साक्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञांनी विशेष सीबीआय न्यायालयासमोर दिली.

जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाअंतर्गत सूरजविरुद्ध खटला सुरू आहे. मुबंईतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील वरिष्ठ वैज्ञानिकाने २०१५ मध्ये सूरजचा वैज्ञानिक चाचणीद्वारे जबाब नोंदवला होता. त्यानंतर तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. तेव्हा या तज्ज्ञाने उपरोक्त साक्ष दिली.

या चाचणीद्वारे एखादी व्यक्ती माहिती लपवते आहे का, ती खरे किंवा खोटे बोलत आहे का ? याचा शोध घेतला जातो. तसेच व्यक्तीच्या स्वभावातील व देहबोलीतील बदलांच्याही नोंदी घेतल्या जातात, असे या तज्ज्ञाने न्यायालयाला सांगितले. जून २०१५ मध्ये सूरजची आपण वैज्ञानिक चाचणी केली. त्याद्वारे त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र त्याचा जबाब काही मुद्यांबाबत अपूर्ण आणि ठरवून दिलेला होता, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याच्या या जबाबातून तो घटनेशी संबंधित माहिती लपवत होता हे दिसून येते, असेही या तज्ज्ञाने न्यायालयाला सांगितले.

जियासोबतचे संबंध का बिघडले आणि का तुटले याबाबत चौकशी केली असता सूरजने त्याची उत्तरे देणे टाळले होते किंवा ती देताना तो शांत होत होता. जियासोबत झालेल्या शेवटच्या भांडणाबाबत तो काही सांगण्यास इच्छुक नव्हता, असेही या तज्ज्ञाने सांगितले. जियाने सूरजला लिहिलेल्या पत्राचेही विश्लेषण केल्याचे आणि हे पत्र चौकशीच्या वेळी सूरजकडून हस्तगत करण्यात आले असावे, असे या तज्ज्ञाने सांगितले. हे पत्र लिहितानाची जियाची स्थिती आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थितीचेही विश्लेषण आपण केले. हे हस्तलिखित पत्र होते आणि ते बहुधा जियाचे अखेरचे पत्र असावे. पत्रावरून जिया खूप नकारात्मक विचार करत असल्याचे आणि प्रेमसंबंध तुटल्याच्या कारणास्तव तिने आत्महत्या केली असावी असे दिसून येते, असे या तज्ज्ञाने न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, जियाने लहानपणी काही मानसिक आघात सहन केले होते हे आपल्याला सूरजकडून कळले आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तीवर वेळेत उपचार केले नाहीत तर स्थिती बिघडू शकते, असे या तज्ज्ञाने उलट तपासणीत न्यायालयाला सांगितले.

Story img Loader