‘मध्य रेल्वेचे विस्कळीत झालेले वेळापत्रक दहा दिवसांच्या आत सुरळीत करा’, या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर मध्य रेल्वेने जारी केलेले सावधगिरीचे आदेश शिथिल करत थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. या परिसरात ठिकठिकाणी लागू केलेल्या सावधगिरीच्या आदेशांपैकी २० टक्के आदेश मंगळवारपासून शिथिल केले आहेत. त्याचा परिणाल लगेचच जाणवून वेळापत्रकातील वक्तशीरपणा किमान २ टक्क्यांनी सुधारेल, असे अधिकारी सांगत आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर होणाऱ्या सततच्या बिघाडांची दखल थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली. त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांना रेल्वेचे वेळापत्रक तातडीने सुरळीत करण्याचे आदेश दिले. मात्र देखभाल-दुरुस्तीसाठी अपुरा वेळ, जुन्या कालबाह्य गाडय़ा, रेल्वेरूळांची अत्यंत क्लिष्ट रचना आणि निधीचा अभाव यांचा मेळ घालून वक्तशीरपणा कसा साधायचा, या पेचात मध्य रेल्वेचे अधिकारी पडले आहेत. या सर्व गोष्टी तातडीने मार्गी लागणे शक्य नसल्याने आता मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने यावर तोडगा शोधला आहे.
काय आहे तोडगा?
सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत कल्याण स्थानक परिसरात गाडी रूळावरून घसरण्याच्या घटना तीन वेळा घडल्या. त्यानंतर येथे सावधगिरीचे आदेश (कॉशन ऑर्डर) लागू करण्यात आले. या आदेशांनुसार कल्याण स्थानकाच्या सहा किलोमीटरच्या परिसरात ठिकठिकाणी ताशी १५ ते ३५ किलोमीटरची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातून गाडय़ा जाताना त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. या टप्प्यातून गाडय़ा ६०-७० किमी प्रतितास वेगाने धावतील.
पश्चिम रेल्वे विस्कळीत
अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे दिरंगाईने धावणाऱ्या पश्चिम रेल्वेने सोमवारी या दिरंगाईची हद्द पार केली. गाडीच्या एका डब्यात आणि नंतर रेल्वेमार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने सुरू होती. या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी या मार्गावरील गाडय़ा किमान सात ते कमाल २० मिनिटे उशिराने धावतात. मात्र याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही. गाडय़ा रद्द होण्याच्या उद्घोषणा होतााना जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काहीही घडले नसल्याचे म्हटले.