रेल्वे व राज्य सरकारची कंपनी; रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती
मुंबईतील दोन उन्नत रेल्वे मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसटी) कायापालट प्रकल्पासह सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्चाचे राज्यातील नऊ प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले. त्यासाठी ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ ही कंपनी स्थापन करण्यात येणार असून त्यात राज्य सरकार व रेल्वेचा ५० टक्के हिस्सा राहणार आहे.
रेल्वेमंत्री प्रभू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात गुरुवारी बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातील रेल्वेप्रकल्प मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्याबाबत प्रभू व फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल हा उन्नत मार्ग ‘पीपीपी’ पद्धतीने खासगी कंपनीच्या सहकार्याने आणि वांद्रे-विरार हा उन्नत रेल्वेमार्ग कंत्राट देऊन संयुक्त कंपनीमार्फत उभारला जाईल व त्याचे काम याच वर्षांत सुरू होईल. चर्चगेट ते वांद्रे हा उन्नत मार्ग नंतरच्या टप्प्यात होईल.
हार्बर मार्गावरील सिग्नल यंत्रणा बदलण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून सध्या चार मिनिटांना एक गाडी हे प्रमाण दोन मिनिटांवर आणले जाईल. या मार्गावर बारा डब्यांच्या गाडय़ा १५ जूनपर्यंत सुरू होतील.
सीएसटीचा कायापालट केला जाणार असून आझाद मैदानाजवळचे मेट्रोस्थानक व चर्चगेट हे भुयारी संकुलाने जोडले जाईल.
सीएसटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसविला जाईल. मोनो-मेट्रो, बेस्ट, टॅक्सी अशा वेगवेगळ्या प्रवासासाठी एकच तिकीटप्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.
वातानुकूलित उपनगरी गाडीच्या चाचण्या सुरू आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. नगर-बीड-परळी, कोल्हापूर-वैभववाडी आदी प्रकल्पांचा नऊ प्रकल्पांमध्ये समावेश
आहे.
‘६५ हजार डबे आंतरराष्ट्रीय तोडीचे करणार’
मुंबई : रेल्वेचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे सूत्र याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी जाणले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेवर प्रचंड भर दिल्याने गेल्या अनेक वर्षांत न झालेली कामे दोन वर्षांत पूर्ण झाली आहेत. प्रवासी हे आमच्या केंद्रस्थानी असून त्यांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देण्यासाठी देशभरातील ६५ हजार डबे आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सुधारणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. माटुंगा येथील रेल्वे कार्यशाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका समारंभात ते बोलत होते.