‘टॅल्गो’च्या चाचणीचा रेल्वेचा मानस, ४८ स्थानकांचा पुनर्वकिास
ताशी ११५ कि.मी वेगाने धावणाऱ्या स्पेनच्या अतिवेगवान रेल्वेगाडीची चाचणी मुंबई-पुणे मार्गावर करण्याचा रेल्वेचा मानस असून या मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यात मुंबई-पुणे प्रवास अवघ्या दीड तासांमध्ये शक्य होण्याचे संकेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. त्याचसोबत रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या सेवा-सुविधा लक्षात घेऊन मुंबई व उपनगरातील एकूण ४८ स्थानकांचे राज्य सरकारच्या मदतीने पुनर्विकास करणार असल्याची घोषणाही त्यांनी रविवारी केली.
रेल्वेच्या ‘हमसफर सप्ताहा’निमित्त हार्बर मार्गावरील डीसी-एसी विद्युत परिवर्तन राष्ट्राला समर्पित करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. स्पेन बनावटीची हाय स्पीड (अतिशय वेगवान) व अत्याधुनिक टॅल्गो रेल्वे गाडीची उत्तर प्रदेशात प्राथमिक चाचणी घेण्यात आली असून, लवकरच या गाडीची मुंबई ते दिल्ली मार्गावर चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरही या गाडीची चाचणी करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
सध्या मुंबई व उपनगरीय रेल्वेने रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात प्रवासी संख्या वाढत असल्याने सेवा-सुविधांची मागणीही वाढत आहे. याच धर्तीवर मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही प्रकल्पांना तातडीने वेग देण्याचे काम सुरू झाले आहे. यात प्रामुख्याने उन्नत मार्गाचा समावेश असून नुकत्याच पार पडलेल्या एका बठकीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून यावर तोडगा काढला जात आहे. यात उन्नत मार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेर सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली.
तसेच येत्या काळात फलाट आणि रेल्वे गाडीतील अंतर समान करणार असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे गाडीत चढ-उतरताना गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय सर्व स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर देशपातळीवर रेल्वेमार्ग विस्तारीकरणाचा वेग ४ किलोमीटरहून १९ किलोमीटर प्रतिदिन करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील ६५ हजार रेल्वे डब्यांच्या नूतनीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे.
परळ टर्मिनसचे आज भूमिपूजन
मध्य रेल्वे मार्गावरील बहुप्रलंबित आणि बहुप्रतीक्षित परळ टर्मिनसचे आज, सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा रेल्वेचे अधिकारी करत आहेत.
नव्या गाडय़ा
देशातील मुख्य शहरादरम्यान काही नवीन गाडय़ा भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यात ‘तेजस’, ‘हमसफर’, ‘उदय’ या गाडय़ांचा समावेश असून हे सर्व प्रकल्प प्राथमिक स्थरावर असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. तर लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळात बदल करण्याचा मुद्दा प्रभू यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.
आठवडय़ाभरात हार्बरवर सर्व गाडय़ा बारा डब्यांच्या!
हार्बर मार्गावरील फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्याने येत्या आठवडय़ाभरात सर्व ९ डब्यांच्या गाडीचे रूपांतर १२ डब्यांच्या गाडीत करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रि. सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. यात सुमारे ६०० गाडय़ांचा समावेश आहे. सध्या या मार्गावर १२ डब्यांच्या ५ गाडय़ा धावत आहेत.