आतापर्यंत मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक कधीच करण्यात आली नाही. मात्र आतापर्यंत काय झाले, यापेक्षाही आपण भविष्यात काय करणार आहोत ते महत्त्वाचे आहे. मुंबईचे देशातील महत्त्व लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील रेल्वेचे जाळे अधिकाधिक चांगले करण्यासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे मुंबईवर येत्या काळात अधिकाधिक सुविधांचा वर्षांव होणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिले.
कांजुरमार्ग स्थानकात सहा मीटर रुंद पादचारी पूल, सरकते जिने, एक नवीन फलाट आदी प्रकल्प तसेच विद्याविहार स्थानकातील नवीन पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याचे कामही ‘एमआरव्हीसी’ने पूर्ण केले आहे. या सर्व कामांसाठी १५ कोटी रुपये खर्च झाले असून या दोन्ही स्थानकांमधील या प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथे व्हिडीओद्वारे करण्यात आले. या वेळी दादर येथे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते. तर कांजुरमार्ग स्थानकात खासदार किरीट सोमैया आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

३० हजार कोटींचा निधी उभारणार
गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी अजिबात निधी दिला गेला नाही. त्यामुळे मुंबईतील रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष झाले. पण आता ती चूक आपण होऊ देणार नाही. मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून ३० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. एवढाच निधी महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठीही उभारला जाईल, अशी ग्वाही प्रभू यांनी दिली.

Story img Loader