गोरखपूरसाठी १४ गाडय़ा; राज्यातील अनेक प्रमुख शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसची संख्या मात्र कमी
लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आदी नेते केंद्रीय रेल्वेमंत्री असताना उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या गाडय़ांची संख्या भरमसाट वाढली होती; पण आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोघांवरही कडी करत एकाच दिवसात मुंबईतील तीन विविध स्थानकांमधून गोरखपूरसाठी तीन वेगळ्या गाडय़ांना हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे याआधीच मुंबईतून गोरखपूरसाठी ११ गाडय़ा सुटतात. त्यात या तीन गाडय़ांची भर पडल्यानंतर उत्तर प्रदेशातील एकटय़ा गोरखपूर येथे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या १४ वर पोहोचली आहे. वाराणसी, अलाहाबाद, पाटणा आदी स्थानकांपर्यंत जाणाऱ्या गाडय़ांची संख्याही लक्षणीय आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक प्रमुख शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसची संख्या मात्र तुलनेने कमी आहे.
रेल्वेमंत्री हा संपूर्ण देशाचा असतो, या सूत्राला तिलांजली देत याआधीच्या रेल्वेमंत्र्यांनी आपापल्या राज्यांसाठी भरमसाठ गाडय़ा, कारखाने आदींची घोषणा केली. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला आणि कोकणालाही बरे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, प्रभू यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतावर मेहेरनजर केली आहे. मुंबईतून गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने सुरू झालेल्या गाडय़ांमध्ये उत्तर भारतात जाणाऱ्या गाडय़ांचेच प्रमाण वाढले आहे. रविवारी तर वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून गोरखपूर येथे रवाना होणाऱ्या तीन गाडय़ांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.
‘जादा गाडय़ांसाठी पाठपुरावा करणार’
याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विचारले असता कोकण तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठीही काही जादा गाडय़ा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांबरोबर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतात जाणाऱ्या गाडय़ा आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या गाडय़ा यांची आकडेवारी, प्रवासी संख्या आदी गोष्टी विचारात घेऊन आपण हा पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राकडे दुर्लक्ष
- गोरखपूर गाडय़ांच्या तुलनेत कोकणात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या लक्षात घेता वातानुकूलित डबलडेकर गाडी वगळता कोकणासाठी एकही नवी गाडी आलेली नाही.
- त्यातही फक्त कोकणासाठी चालणाऱ्या गाडय़ांमध्ये ‘दिवा-सावंतवाडी पॅसेंजर’, ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ आणि ‘दादर-सावंतवाडी राज्यराणी’ या तीनच गाडय़ा आहेत.
- उर्वरित गाडय़ा गोव्यासाठी चालवल्या जातात. मुंबई-लातूर, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-कोल्हापूर या दरम्यान प्रवाशांची संख्या वाढूनही येथे नव्या गाडय़ा सोडण्यात येत नाहीत, ही रड कायम आहे.