ग्रॅन्ट रोड परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या मोराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याला खार येथील रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर: ‘त्या’ वाघाच्या मिशा व चार दात जप्त
दक्षिण मुंबईतील ग्रॅन्ट रोड परिसरातील एका इमारतीवर १९ ऑगस्ट रोजी रहिवाशांना मोराचे दर्शन घडले. भरवस्तीत आलेल्या मोराचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र हा मोर बराच वेळ एकाच ठिकाणी बसून होता. नागरिकांची गर्दी वाढत असतानाही मोर जागचा हलत नव्हता. काही नागरिकांनी बारकाईने पाहिल्यानंतर मोराच्या पायाला दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी तात्काळ रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मोराविषयी माहिती दिली.
हेही वाचा – गडचिरोली : सावधान! घराबाहेर पडू नका, गावात वाघ आलाय…
संघटनेचे कार्यकर्ते तात्काळ ग्रॅन्ट रोडला पोहोचले आणि त्यांनी मोठ्या शिताफीने मोराला ताब्यात घेतले. मोराच्या पायाला जखम झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ मोराला खार येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर मोराच्या एका पायाचे हाड तुटल्याचे निदर्शनास आले. शस्त्रक्रिया करून मोराच्या पायात सळी घालण्यात आली. सध्या मोराला खार येथील उपचार केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.मोर आता हळूहळू चालू लागला आहे. मात्र पूर्ण बरा होण्यासाठी दोन-तीन आठवडे लागतील, असे ‘रॉ’चे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.