मुंबई : बदलत जाणारी जीवनशैली, शारीरिक व मानसिक ताणतणाव, आजारपण अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे कृत्रिम गर्भधारणेची (आय. व्ही. एफ) प्रक्रिया व उपचार होण्याचे प्रमाणही चांगले आहे. पण काही जोडप्यांना हे सर्व प्रयत्न करुनही यश येत नाही आणि वयही वाढत राहते. अशा वेळी ‘सरोगसी’ या पर्यायाकडे वळण्याचा आलेख गेल्या वर्षभरात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाढताना आढळत आहे. प्रत्येक महिन्याला १० ते १२ इच्छुक जोडपी जिल्हा स्तरीय वैद्यकीय मंडळाकडे संपर्क साधत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरोगसीची नोंदणी आणि सरोगसीचे नियमन करण्यासाठी सध्या मुंबईत २७ नोंदणीकृत सरोगसी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून वंध्यत्वाने ग्रासलेल्या, सामान्य परिस्थितीत असणाऱ्या जोडप्यांना एक नवीन आशा दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरोगसी व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी नियमन) कायदा २०२१ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश डॉ. शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत.

हेही वाचा…ऑलिवंट, ऑर्थर, एस पुलांच्या पुनर्बांधणीची गरज नाही, रेल्वे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेला पत्र

भारतात साधारणतः प्रत्येकी हजार जोडप्यांमागे १८ जोडपी वंध्यत्वग्रस्त आहेत. मुंबईत नोंदणीकृत सरोगसी केंद्रातून इच्छुक जोडपी, इच्छुक महिला यांच्यासाठी एकूण ६६ वैद्यकीय संकेत प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर अत्यावश्यक प्रमाणपत्र आठ जणांना देण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेची एकूण २७ नोंदणीकृत सरोगसी केंद्रे आहेत. सरोगसी संबंधित प्रश्नांबाबत व मार्गदर्शनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. तसेच नोंदणीकृत सरोगसी केंद्रातून सरोगसी नोंदणी करावी, असेही आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले.

सरोगसी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आवश्यक प्रमाणपत्रे

-सरोगसी मातांसाठी पात्रता प्रमाणपत्र’
-वैद्यकीय संकेत प्रमाणपत्र
-आवश्यकता प्रमाणपत्र
-पालकत्व आदेश

हेही वाचा…सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी महारेराची नियमावली लागू

सरोगसी कोण करू शकते?

वंध्यत्वाचे सर्व उपाय अपयशी ठरल्यानंतर व काही वैद्यकीय परिस्थिती असलेले इच्छुक जोडपे व इच्छुक महिला सरोगसीसाठी प्रयत्न करू शकतात.

‘सरोगसी माता’ कोण होऊ शकते

-माता वैवाहिक असावी व स्वतःचे एक तरी मूल असावे.
-ती सरोगसी माता वैद्यकीय व मानसिकरीत्या सक्षम असावी. तिच्या पतीची त्यासाठी संमती असावी
-घटस्फोटीत, विधवा महिला सरोगसीसाठी अर्ज करू शकतात.
-तिचे याकरिता ‘प्रतिज्ञापत्रक’ असावे.
-सरोगसी मातेचे वय २२ ते ३५ वर्षे असावे.
-तिला तिच्या राहत्या ठिकाणच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे ‘पात्रता प्रमाणपत्र’ द्यावे.
-इच्छुक जोडपे व इच्छुक महिला यांनी सरोगसी मातेचे ३६ महिन्यांकरिता ‘वैद्यकीय विमा प्रमाणपत्र’ काढणे आवश्यक असते.
-महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून ‘पालकत्व आदेश’ या दोन बाबींची पूर्तता झाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यामार्फत इच्छुक जोडप्याला ‘अत्यावश्यक प्रमाणपत्र’ देण्यात येते.

हेही वाचा…Ghatkopar Hoarding collapse: इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् तेवढ्यात होर्डिंग कोसळलं; दाम्पत्याचा मृत्यू

वैद्यकीय संकेत प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

-वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी इच्छुक जोडपे किंवा इच्छुक महिला यांना दिलेले ‘पात्रता प्रमाणपत्र’.
-त्यासाठी आवश्यक असणारे उपचार केलेले सर्व वैद्यकीय पुरावे.
-उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचे ‘शिफारस प्रमाणपत्र’
-या सर्वांची छाननी करूनच ‘वैद्यकीय संकेत प्रमाणपत्र’ इच्छुक जोडपे किंवा इच्छुक महिला यांना देण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surrogacy on the rise in mumbai as infertility rates increase 10 to 12 couples apply for surrogacy every month mumbai print news psg