धुळ्याच्या ‘सुरूपसिंग नाईक आयुर्वेद महाविद्यालया’त अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याच्या नावाखाली प्रत्येक विषयाकरिता म्हणून १७ हजार रुपये असे अव्वाच्या सव्वा शुल्क नियमबाह्यपणे आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुनर्परीक्षेसाठी विद्यापीठाचे परीक्षा शुल्क वगळता कोणतेही अतिरिक्त शुल्क महाविद्यालयाला घेता येत नाही. तरीही गेली अनेक वर्षे महाविद्यालय पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून मनमानीपणे नियमबाह्यपणे शुल्कवसुली करते आहे.
या वर्षी ही रक्कम ४ हजारांवरून १७ हजार रुपये केल्याने पालकांनी त्याविरोधात आवाज उठविला. त्यामुळे हा प्रकार उघडकीला तरी आला. अन्यथा पालकांची आर्थिक पिळवणूक सुरूच राहिली असती. पालकांनी या प्रकाराची तक्रार ‘शुल्क नियंत्रण समिती’कडे केल्याने आता महाविद्यालयाने नरमाईची भूमिका घेतली आहे. हे शुल्क भरले नाही तरी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ, असे महाविद्यालयाचे संचालक सुवालाल बाफना यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. समितीच्या परवानगीनेच आम्ही पुनर्परीक्षार्थीकडून हे शुल्क घेत होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, समितीने खासगी महाविद्यालयांच्या शुल्करचनेकरिता ठरवून दिलेल्या बाबींमध्ये या प्रकारच्या परीक्षा शुल्काचा उल्लेखच नाही. पालकांच्या तक्रारीवरून समितीने महाविद्यालयाला ८ नोव्हेंबरला चौकशीकरिता बोलाविले आहे. यावेळी समितीकडून महाविद्यालयाची चांगलीच कानउघडणी होण्याची शक्यता आहे.
फेरपरीक्षेसाठी फतवा
महाविद्यालयाने ऑक्टोबर-२०१२ला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जुलै-२०१३ला झाली. सप्टेंबरला निकाल लागल्यानंतर केवळ सहाच विद्यार्थी सर्वच्या सर्व पाच विषयांत उत्तीर्ण झाले. तर सहा विद्यार्थ्यांना एटीकेटी लागली. उर्वरित विद्यार्थी दोनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांची आता नोव्हेंबर-२०१३ला पुनर्परीक्षा होणार आहे. मात्र, परीक्षेचा अर्ज भरून घेण्यापूर्वी महाविद्यालयाने प्रत्येक विषयासाठी विद्यार्थ्यांनी १७ हजार रुपये भरावे, असा फतवा काढला. या शिवाय पुढील वर्षांच्या सुमारे ८५ हजार रुपये शुल्काचीही मागणी केली. पुनर्परीक्षेचा निकाल लागण्याआधी पुढील वर्षांचे शुल्क सहा महिने आधीच भरायचे. त्यात पुन्हा प्रत्येक विषयाच्या पुनर्परीक्षेकरिता म्हणून १७ ते ८५ हजार रुपये शुल्क भरायचे. खिशावर येणारा हा अतिरिक्त ताण न पेलणारा असल्याने पालकांनी या प्रकाराची तक्रार समितीकडे केली.
सुविधांची बोंब
राज्याचे दीर्घकाळ मंत्री राहिलेल्या सुरूपसिंग नाईक यांच्या नावाने सुरू असलेल्या धुळ्याच्या या महाविद्यालयात सुविधांचाही अभाव आहे. या महाविद्यालयात अनेक विषयांचे शिक्षकच नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षक वर्गावर क्वचितच येत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्व भर क्लासेसवर असतो. आज तुम्ही येणार का, असे विद्यार्थीच शिक्षकांना दररोज दूरध्वनी करून विचारतात. शिक्षक येणार असले तरच आम्ही महाविद्यालयात येतो. अन्यथा महाविद्यालयाचा परिसर भकास असतो, असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
शवविच्छेदनासाठी एकच मृतदेह
शवविच्छेदनासाठी सात विद्यार्थ्यांच्या गटासाठी एक मृतदेह असावा असा नियम आहे. पण, आमच्या ४० विद्यार्थ्यांच्या संपूर्ण तुकडीला मिळून एकच मृतदेह विच्छेदनासाठी दिला जातो. आम्हाला तर वर्षांतून केवळ दोनवेळाच शवविच्छेदनाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
– एक विद्यार्थिनी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा