मुंबई : धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) धारावी पुर्नविकास प्रकल्पाअंतर्गत मार्चपासून धारावीतील विविध भागातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले होते. धारावी बचाव आंदोलन, धारावीकरांच्या तीव्र विरोधानंतर डीआरपीपीएलने तूर्तास हे सर्वेक्षण बंद केले आहे. नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड शुक्रवारी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट घेऊन धारावीकारांच्या मागण्या मांडणार आहेत.

धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. तर या पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समूहाकडून संयुक्त अशा डीआरपीपीएलची स्थापना करण्यात आली आहे. याच डीआरपीपीएलच्या माध्यमातून मार्चपासून सर्वेक्षण सुरू आहे. रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार नाईक नगर येथे सोमवारी करण्यात येत असलेले सर्वेक्षण धारावी बचाव आंदोलनाने रोखून धरले. तर मंगळवारी ही नाईक नगरमधील सर्वेक्षणाला विरोध करत कर्मचारी-अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. ५०० चौ फुटाच्या घरांसह धारावीकरांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांवर कोणताही निर्णय झालेला नसताना सर्वेक्षणाची घाई का, असा सवाल करत धारावी बचाव आंदोलनाने सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समन्यवक ॲड. राजू कोरडे यांनी दिली.

हेही वाचा…मुंबईत हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण

धारावीकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर डीआरपीपीएलने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्वेक्षण तूर्तास थांबवत असल्याचे जाहीर केले. काहींच्या राजकीय स्वार्थासाठी सर्वेक्षण थांबवावे लागल्याचेही डीआरपीपीएलने नमूद केले आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाने बुधवारी श्रीनिवास यांची भेट घेत सर्वेक्षण बंद करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सर्वेक्षण तूर्तास थांबविण्यात आले आहे. दरम्यान खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड शुक्रवारी श्रीनिवास यांची भेट घेणार आहेत.