मुंबई : राज्यातील ५६ शहरांमधील मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून या समाजाच्या विकासाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील मुस्लीम समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी २०१३ मध्ये मेहमुदर रेहमान यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमण्यात आला होता. या गटाने दिलेल्या अहवालानुसार मुस्लीम समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने केलेले प्रयत्न आणि सध्याची परिस्थिती याचा पुन्हा अभ्यास करण्याचे ठरविण्यात आले आहे.
अभ्यास गटाच्या माध्यमातून मुस्लीम समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक, वित्तीय सहाय्य, पायाभूत सुविधा आदी योजनांचा किती फायदा झाला, याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील मुस्लिमबहुल ५६ शहरांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून या समाजाच्या स्थितीचा तसेच, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी ३३ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.