मुंबई : मुंबईतील ४७.१० टक्के बेकरीत मुंबईतील प्रदूषणात भर घालत असून इंधन म्हणून लाकडाचा वापर करत असल्याचे बॉम्बे एन्व्हॉयर्न्मेंटल ॲक्शन ग्रुपच्या (बीइएजी) सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. बेकरीत इंधन म्हणून लाकडाचा वापर केल्याने केवळ पर्यावरणावरच नाही तर मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. लाकडाच्या वापरामुळे हवेत घातक प्रदूषके मिसळली जातात. दरम्यान, ‘एन्व्हिजनिंग अ सस्टेनेबल बेकरी इंडस्ट्री फॉर मुंबई’ या सहा महिन्यांच्या अभ्यासात एकूण २०० बेकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
मुंबईतील बहुतांश बेकरी या भट्टीसाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर करत असल्याचे या अभ्यासात आढळले. दिवसाला सरासरी १३० किलो लाकूड या बेकरींत वापरले जाते. मोठ्या काही बेकरी दिवसाला २५० ते ३०० किलो लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात. लाकडाचा वापर होणाऱ्या बेकरींमधील उत्सर्जन हे पीएम १० आणि पीएम २.५ यांचे प्राथमिक स्रोत आहे. ज्यांचे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये अगदी आतपर्यंत पोहचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज् हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरते. लाकूड जाळणाऱ्या बेकरींमध्ये तयार होणाऱ्या राखेची विल्हेवाट बहुतेकवेळा कचराडेपोत लावली जाते.
हेही वाचा…दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधात दाभोलकर कुटुंबीय उच्च न्यायालयात
अभ्यासासाठी भेट दिलेल्या आणि सर्वेक्षण केलेल्या विभागांपैकी ई विभागात सर्वाधिक (२३) बेकरी असून, त्यापाठोपाठ बी आणि के (पश्चिम) विभागामधील २१ बेकरींना भेट देण्यात आली. ई विभागामध्ये लाकूड आणि विजेचा वापर अनुक्रमे १२ आणि सात बेकरींमध्ये सर्वाधिक होतो. के (पश्चिम) विभाग इंधनासाठी विशेषत: एलपीजीवर अवलंबून आहे, २१ पैकी १३ बेकरींमध्ये त्याचा वापर केला जातो.
हेही वाचा…मृत्यूच्या छायेत प्रवाशांचा रेल्वे प्रवास, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग पडला
दरम्यान, वीज अथवा गॅसचा वापर करुन बेक केलेल्या उत्पादनांपेक्षा बेकींगसाठी लाकडाचा वापर केलेल्या उत्पादनास ग्राहक अधिक प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.