मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील रहिवाशांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) घेतला आहे. या सर्वेक्षणाला १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. विशेष संगणकीय प्रणालीद्वारे संगणकीय पद्धतीने रहिवासी, बांधकामांची माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणाला धारावीतील कमला रमण नगर येथून सुरुवात होणार आहे. या माहितीच्या आधारे पुढे रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. अदानी समूहाला पुनर्विकासाचे कंत्राट देण्यात आले. आता आणखी एक पाऊल पुढे टाकून येथील बांधकाम, रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणाला १८ मार्चपासून सुरुवात होणार असल्याची माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?
संगणकीय पद्धतीने हे सर्वेक्षण होणार असून यासाठी विशेष संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक सदनिकेला, बांधकामाला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार असून संबंधित गल्ल्यांचे लेसर मँपिंग केले जाणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान रहिवाशांना कोणत्याही अडचणी आल्या वा सर्वेक्षणाबाबत काही प्रश्न असतील तर त्याचे, अडचणींचे निरसन करण्यासाठी डीआरपीपीएल हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. रहिवाशांना आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत क्रमांक १८०० २६८ ८८८८ वर संपर्क साधता येईल.