केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दांडी मारण्यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.
पोलीस दलातील सुधारणांसाठी ही बैठक झाली. या बैठकीला काँग्रेससह विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती हाच चर्चेचा विषय झाला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असे सांगण्यात येत असले तरी यामागे शिंदे-चव्हाण यांच्यातील धुसफूस कारणीभूत असल्याचे समजते. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यावर राहुल गांधी यांनी सर्व राज्यातील काँग्रेसच्या खासदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांच्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारीचा सूर लावण्यात आला. पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील कामांना विलंब लागतो. कामांचा वेग वाढला पाहिजे, असे मत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. त्यातून शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहेत, असा संदेश पक्षात गेला. दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात शिंदे-चव्हाण यांच्यात आलबेल नाही याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यशैलीवरून राज्यातील पक्षाच्या खासदार-आमदारांमध्ये काहीशी असंतोषाची भावना आहे. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील संबंध लक्षात घेता कोणी उघडपणे विरोधात जाण्याचे टाळतात. केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या बैठकींना उपस्थित राहण्यावर चव्हाण यांचा भर असतो. फारच अपवादात्मक परिस्थितीत ते अशा बैठकांना अनुपस्थितीत राहतात. शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री  मुद्दामहूनच अनुपस्थित राहिल्याची काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. ‘आदर्श’ घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय शिंदे यांना पसंत पडला नव्हता, असे सांगण्यात येते.