बडय़ा नेत्याची मुलगी म्हणजे राजकारणात आयता व थेट प्रवेश, सारी यंत्रणा दिमतीला असेच समज राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींविषयी असतात. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय असते? पक्षीय राजकारण, प्रशासकीय कारभार खूप सोपा होतो की निर्णय घेताना, ते राबवून घेताना वलयाचे दडपण असते? अशा साऱ्या शंका-प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काँग्रेसच्या तरूण आमदार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे ‘व्हिवा लाऊंज’मध्ये वाचकांच्या भेटीला येणार आहेत.
९ मे रोजी शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात दुपारी साडेतीन वाजता मुलाखत व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्या संवाद साधतील.
राजकारणापासून प्रशासकीय सेवा, खेळ, कला अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या युवती-महिलांच्या जडणघडणीची, त्यांच्या संघर्षांची, परिश्रमांची ओळख ‘व्हिवा लाऊंज’मधून उलगडत असते. प्रणिती शिंदे या नुसत्याच तरुण-तडफदार आमदार म्हणून नव्हे तर विधिमंडळ कामकाजात अत्यंत गांभीर्याने भाग घेणाऱ्या, मतदारसंघातील कामे, कार्यकर्त्यांच्या अडचणी याबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या व त्यासाठी सतत मेहनत घेणाऱ्या आमदार म्हणून ओळखल्या जातात.
‘शिंदेसाहेबांची मुलगी’ ते एक कष्टाळू लोकप्रतिनिधी असा प्रवास करत प्रणिती यांनी सोलापुरात व राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. ‘जाई-जुई’ विचारमंचच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आपल्या कल्पकतेची चुणूक त्यांनी दाखवली आहे.राजकारणातील प्रवेश, त्यासाठी घेतलेली मेहनत, पहिल्या निवडणुकीचा अनुभव, जिंकल्यानंतर एक आमदार म्हणून कशारितीने लोकांशी संवाद वाढवला. मतदारसंघातील कामे करताना काही अडचणी येतात काय, एका मातब्बर नेत्याची मुलगी असल्याने राजकारणात-लोकांमध्ये वावरताना काही दडपण येते काय, वैयक्तिक आवडी-निवडी, छंद काय, ते जपण्यासाठी राजकारणाच्या धकाधकीतून वेळ काढणे जमते काय असे प्रणिती यांच्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनाचे पैले या मुलाखतीत उलगडले जातील.

Story img Loader