भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली. मात्र, त्यांचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी मैदानात अनेक अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपा अपक्ष उमेदवारांच्या आडून काही खेळी करत आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिका मांडली. तसेच भाजपा राजकारणातील सर्व डाव वापरणार आहे याचा आम्हाला अंदाज असल्याचं म्हटलं. त्या गुरुवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “प्रेम, युद्ध आणि राजकारणात सर्व चालतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत सोज्वळ राजकारणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. भाजपा त्यांच्या पद्धतीने राजकारणातील सर्व डाव वापरणार याचा आम्हाला अंदाज आहे.”

“भाजपा साम, दाम, दंड आणि भेद या सर्व गोष्टींचा वापर करेल”

“भाजपा साम, दाम, दंड आणि भेद या सर्व गोष्टींचा वापर करेल. त्यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला म्हणजे ते प्रमाणिकपणे संवदेनशील संस्कृती जपणारे आहेत या भ्रमात आम्ही अजिबात नाही. घोडा मैदान लांब नाही. निकाल लवकरच लागेल.,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपाला टोला लगावला.

“सत्तारांना कुळव, रुमणं, दांडा, पाळी, पेरणी कळत नाही”

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार राज्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नाही असं म्हणत आहेत. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “तुम्ही अब्दुल सत्तारांना उगाच त्रास देत आहात. ज्यांना शेतीविषयी काहीच माहिती नाही त्यांना उगाच का त्रास द्यायचा. ज्यांना कुळव, रुमणं, दांडा कळत नाही, ज्यांना पाळी, पेरणी कळत नाही त्यांना काय सांगायचं.

हेही वाचा : एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का? भाजपाचे मंत्री म्हणाले…

“हाफकिन म्हणजे काय कळत नसणारे आरोग्यमंत्री”

“अब्दुल सत्तारांनी सोयाबिनचं नुकसान पाहण्यासाठी एकदा आमच्या कोरडवाहू शेतात यावं. कारण ज्यांना हाफकिन म्हणजे काय हे कळत नाही अशी माणसं आरोग्यमंत्री झाले आहेत,” असं म्हणत अंधारेंनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare comment on bjp politics in andheri east bypoll rno news pbs