शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केलं. यात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शीतल म्हात्रेंना व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असेल तर त्यांनी खरा व्हिडीओ समोर आणावा, असं थेट आव्हान दिलं आहे. त्या मंगळवारी (१४ मार्च) माध्यमांशी बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या फेसबूक खात्यावरून जे लाईव्ह झालं होतं ते नंतर डिलीट करण्यात आलं. ते सायबर पोलिसांनी ‘रिकव्हर’ केलं पाहिजे. व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असेल, तर त्यांनी ओरिजिनल व्हिडीओ दाखवलाच पाहिजे.”
“व्हिडीओ व्हायरल करणे हा गुन्हा नाही”
“जी एसआयटी नेमायची आहे ती उच्च न्यायालयाच्या अखत्यारित नेमली पाहिजे. व्हिडीओ व्हायरल करणे हा गुन्हा नाही. व्हिडीओ पहिल्यांदा अपलोड करणारा गुन्हेगार असतो. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली.
हेही वाचा : “सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन…”, शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवर संजय राऊतांचा हल्लाबोल
“शिंदेंनी फडणवीसांकडून गृहमंत्रालय काढून घ्यावं”
“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. चर्चेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल, तर गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने आदेश देऊन गृहखातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काढून घेतलं पाहिजे. हे चुकीचं होत आहे,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.