Urfi Javed Chitra Wagh Controversy : भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यात तीन दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ या सातत्याने उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. अशातच काल ‘उर्फी जावेद मला भेटली, तर तिच्या थोबडीत मारेन’, असं विधान चित्रा वाघ यांनी केलं होतं. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“सार्वजनिक ठिकाणी महिलांशी छेडछाड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी बोललं पाहिजे. तो जास्त महत्त्वाचा विषय आहे. एका उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिलांना सार्वजनिक ठिकाणी ज्या अत्याचाराचा, समस्यांचा सामना करावा लागतो, त्यावर त्यांनी बोलावं”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
हेही वाचा – फक्त जीन्स परिधान करत उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो; म्हणाली…
पुढे बोलताना त्यांनी पुजा चव्हाण प्रकरणावरूनही चित्रा वाघ यांच्यावर टीकास्र सोडले. “महिलांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू नये. खरं तर महाविकास आघाडीने ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्यांनाच आज भाजपाने मंत्रीमंडळात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता जर संजय राठोड निर्दोष असतील, तर प्रश्न असा निर्माण होतो, की पुजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलं का? पीडितेचं नाव घेऊ नये, असा आपल्याकडे अलिखीत नियम आहे, मग केवळ राजकीय शिड्या मजबूत करण्यासाठी तुम्ही एका भटक्या विमुक्त समजातील मुलीच्या अब्रुचं तुम्ही खोबरं उधळलं, त्याचं काय? यावर बोललं जात नाही”, असे त्या म्हणाल्या.
“मुळात गौरी शेलार किंवा रिकीं बक्सल असेल, अशा असंख्य मुलींची नावं सांगता येईल, ज्यावर सोयीचं मौन पाळलं जातं. कोणता मुद्दा उचलायचा हे ठरवण्यासाठी आधी त्याची जात कोणती, धर्म कोणता, त्याचा पक्ष कोणता, त्याचा वैचारिक दृष्टीकोन काय आहे? हे तपासलं जातं आणि त्यानंतर त्याला टार्गेट केलं जातं. हे दुर्दैवी आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.