भर रस्त्यात प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार केले आणि तिची हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकी काय घटना घडली?
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलांशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मयत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती. ही हत्या होत असताना लोक व्हिडीओ काढत होते. ज्यावरुन आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा- वसईत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, वाचवण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात लोक मग्न
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“वसईत झालेली तरुणी हत्या काळजाचा थरकाप उडवणारी आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात. हे चित्र विदारक आहे, कायद्याचा बडगा हा अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्याच्या माथी पडतो. मदत करायला आलेल्या माणसांना पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील का हे वाटतं. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लोक पुढे येऊन मदत करत नाहीत. आजही त्या मुलीची हत्या होत असताना त्या मुलीला कुणी मदत केली नाही. महाराष्ट्राच्या राजधानीलगत इतकी गंभीर घटना घडणं हे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारं आहे. असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
लोक व्हिडीओ काढण्यात मग्न
सकाळची वेळ असल्याने रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी होती. आरोपी यादव आरतीवर वार करत असताना लोकं व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते. कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. एक तरुण फक्त आरोपीला अडवायला पुढे होता. मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. लोकं पुढे आली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असे पोलिसांनी सांगितले.