गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या या खोटारपडेपणामुळेच लोकसभा निवडणुकीतही भाजपाला फटका बसला, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपाला आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नवा शब्द काढला. तो म्हणजे ‘फेक नरेटिव्ह’, पण या फेक नरेटीव्हचं महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस आहेत. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण या देशात १९५० मध्ये घटना लागू झाली. त्यानंतर आरक्षण लागू झालं. १९६० मध्ये त्याचा कार्यकाळ संपत होता, तोही फक्त राजकीय आरक्षणाचा, तो वाढण्याचा निर्णय तेव्हाच्या काँग्रेस सरकारने घेतला. १९६० मध्ये भाजपा अस्तित्वातही नव्हती. त्यांच्या जन्मही झाला नव्हता. त्यानंतर १९७० मध्ये पुन्हा राजकीय आरक्षणाची मुदत वाढवली. ती सुद्धा काँग्रेसच्या सरकारने वाढवली. तरीही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आरक्षण भाजपाने वाढवलं, हेच ‘फेक नरेटिव्ह’चं उत्तम उदाहरण आहे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यातील जागांबाबत मोठं वक्तव्य

“देशात संविधानाला धोका”

“या देशात संविधानाला धोका आहे. तो अजूनही संपलेला नाही. त्यांचं जीवंत उदाहरण भाजपाने घालून दिलं आहे. संविधानानुसार न्यायपालिका आणि कायदेमंडळ या वेगळ्या संस्था आहेत. न्यायापालिकेने त्यांची स्वायतत्ता अबाधित ठेवली पाहिजे. त्यासाठी न्यायाधीश पदावरच्या असलेल्या व्यक्तीने त्याचे धार्मिक कल सार्वजनिक करू नये, असं असतानाही या देशाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील, तर याचा अर्थ आम्ही काय काढायचा?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Sushma Andhare : “त्या आमच्या लाडक्या भावजय, पण कधी-कधी…”; सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीस यांच्यावर पलटवार!

“लाडकी बहीण योजनेवरूनही केलं लक्ष”

पुढे बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही शिंदे सरकारला लक्ष्य केलं. “लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, पण ही योजना आमच्या डोळ्यात खुपण्याचं कोणतेही कारण नाही. महिलांनी या योजनेचे पैसे घेतलेच पाहिजे. कारण सरकारने १५०० रुपये फडणवीसांचा नागपूरमधील बंगला विकून दिलेले नाही. ते पैसे जनतेचे आहेत. शिंदे सरकारने फक्त ते महिलांना देण्याचं काम केलं आहे. सरकार फक्त पोस्टमन आहे. त्यामुळे सरकारने या योजनेचं श्रेय घेण्याचं काम करू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच भाऊ जेव्हा बहिणीला काही देतो, तेव्हा तो त्याची जाहिरात करत नाही. बॅनर लावत नाही. पण शिंदे सरकारकडून जोरदार जाहिराती सुरू आहेत. हे लोकं बहिणीची आणि तिच्या गरीबीरीच थट्टा करत आहेत. यांना बहीण-भावाचं नातं कळत नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.