केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे दहा वर्षे लोटांगण घालून आमदार, खासदार आणि महसूल मंत्रीपद मिळविले. किरण पावस्कर दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर नेत्यांवर टीका केली आणि त्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे यांच्यामागे एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांच्या जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल केला. ईडीमुळे या गटातील नेत्यांना हिंदूत्व आठवले आहे. ठाकरे यांनी कधीच हिंदूत्व सोडले नाही. दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी पोटनिवडणुकीस उभ्या राहिल्या असताना शिंदे गटाने त्यांना पाठिंबा देण्याऐवजी भाजपला जागा दिली. या नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नाही व शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही. स्वत: च्या लाभाखेरीज त्यांना काही दिसत नाही, असे टीकास्त्र अंधारे यांनी सोडले. राणे यांच्या मुलांचा उल्लेख त्यांनी ‘ वाह्यात बाजारबुणगे’ असा केला.
शिंदे गटातील खोके घरी पाठवावेत- भास्कर जाधव</strong>
शिंदे गटावर आगपाखड करीत आमदार भास्कर जाधव यांनी पन्नास खोके, एकदम ओकेचा उल्लेख करून किमान निम्म्या खोक्यांना घरी पाठविण्याचे व उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी एकदिलाने व मजबुतीने उभे राहण्याचे आवाहन केले. ठाकरे यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी काहीही नाही. पण आपण त्यांच्या पाठिशी निष्ठेने उभे राहिले पाहिजे आणि त्यांनी कधीही हिंदूत्वाशी तडजोड केली नसल्याचे सांगितले.