मंगल हनवते
मुंबई : तलाठी भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला गणेश घुशिंगे म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारातही संशयित आरोपी आहे. गणेश हा म्हाडा परीक्षेच्या निवड यादीत अव्वल आला होता आणि तो एका परीक्षार्थीसाठी डमी उमेदवार म्हणूनही बसला होता. या प्रकरणी टीसीएसने गणेशला दोषी ठरविले असून त्याच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडाच्या ५६५ रिक्त पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०२१ मध्ये परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेच्या काही तास आधी गैरप्रकार घडकीस आल्याचे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली. मात्र यातही गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. मराठवाडय़ातील परीक्षा केंद्रावर दलालांमार्फत अनेक बोगस उमेदवारांना परीक्षेस बसविण्यात आल्याचे, परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप म्हाडाने फेटाळल्यानंतर समितीने सर्व पुरावे दिले. त्यानंतर टीसीएसच्या चौकशी अहवालात म्हाडाच्या निवड यादीतील अव्वल आलेले ६० परीक्षार्थी दोषी आढळले. त्यानंतर म्हाडाने या ६० जणांची निवड रद्द करून खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असे असताना आता या ६० जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या गणेश घुशिंगेला तलाठी परीक्षा गैरप्रकारात अटक झाली आहे.
गणेश हा म्हाडा भरती परीक्षेच्या निवड यादीत अव्वल आला होता. तर तो एका परीक्षार्थीसाठी डमी उमेदवार म्हणून बसला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी गणेशची चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी जबाब नोंदवून, नोटीस देऊन त्याला सोडण्यात आल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. गणेशला परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरावर संशयित म्हणून अटक करण्यात आली असून या वेळी त्याच्याकडे अनेक अत्याधुनिक यंत्रसामग्री आढळली होती. त्याला २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यामागे टोळी असून त्याच्या साथीदारांचा शोध पोलिसांचे विशेष पथक घेत असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. तसेच म्हाडा वा इतर परीक्षेच्या अनुषंगाने काही धागेदोरे आढळल्यास संबंधित पोलिसांकडून त्यादृष्टीने चौकशी होईल, असेही त्यांनी सांगितले.
मागील काही वर्षांत स्पर्धा समन्वय समितीने अनेक भरती घोटाळे उघड केले आहेत. त्याप्रकरणी गुन्हे दाखल होतात, काहींना अटक होते, तपास सुरू राहतो; पण असे गैरप्रकार करणाऱ्या टोळय़ा सक्रिय असून त्यांच्या मुसक्या आवळल्या जात नसल्याने भरती परीक्षेतील गैरप्रकार सुरूच आहेत. त्यामुळे या टोळय़ांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्व भरती गैरप्रकार प्रकरणे एकत्रित एसआयटीकडे द्यावीत. तसेच भरती पेपरफुटीप्रकरणी राजस्थान, बिहारच्या धर्तीवर कडक कायदा व्हायला हवा. – राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती