लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पंजाबमध्ये कट रचून दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जितंदर सिंह ऊर्फ ज्योति याला सोमवारी अटक केली. आरोपी मूळचा पंजाबमधील गुरूदासपूर येथील रहिवासी असून खलिस्तान दहशतवादी लखबीर सिंह ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितर सिंह ऊर्फ पवित्र बाटला यांच्या विश्वासू साथीदार आहे. आरोपी बब्बर खालसासाठी शस्त्रास्त्रे वितरणाचे काम करीत होता.
एनआयएच्या तपासानुसार, जतिंदर हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा (आंतरराष्ट्रीय) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. परदेशात असलेल्या लांडाने संघटनेची स्थापना केली होती. अटक आरोपी जतिंदर हा पवित्र बाटला याचा विश्वासू मानला जातो. तो लांडा व बाटला यांच्यासाठी पंजाबमध्ये शस्त्रांचे वितरण करण्याचे काम करीत होता, असा आरोप आहे. याप्रकरणी जुलै, २०२४ मध्ये बलजीत सिंह ऊर्फ राणा भाईला अटक झाली होती. तेव्हा आरोपी जतिंदरचा याप्रकरणातील सहभाग उघड झाला होता.
आणखी वाचा-अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
जतिंदर सिंहने मध्य प्रदेशातून शस्त्र पुरवठादार बलजित सिंह ऊर्फ राणाभाईकडून दहा पिस्तुले आणली होती. ती पंजाबमधील लांडा व बटाला यांच्याशी संबंधित व्यक्तींना पुरवली होती. तो गेल्या अनेक महिन्यांपासून मध्य प्रदेशातून तस्करी करून पंजाबमध्ये शस्त्रे आणण्याच्या प्रयत्नात होता. त्याची माहिती एनआयएला मिळाल्यानंतर त्याचा डाव उधळला.
पंजाबमधील दहशतवाद कट प्रकरणात जतिंदरची अटक महत्त्वाची मानली जाते. याशिवाय दहशतवादी कटासाठी शस्त्र व स्फोटके पुरवणारी मोठी साखळी मोडीत काढण्यात एनआयएला यश आले.