मुंबईः दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली. याप्रकरणी देशपांडे यांना न्यायालयाने १८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. देशपांडे यांचे जानेवारी महिन्यात निलंबन करण्यात आले होते. त्यांनी पदाचा गैरवापर करून २०१७ मध्ये रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा आरोप आहे.
हेही वाचा >>> मुंबई : तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बस सुरू; बेस्टच्या चार आगारातील ३६९ बसेसची पुन्हा धाव
दापोलीतील साई रिसॉर्टवरून भाजप नेते किरीट सोमय्या अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. असे असताना आता याप्रकरणी ईडीने तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांन अटक केली. त्यापूर्वी देशपांडे यांचे निलंबन करून राज्य शासनाने चौकशी सुरू केली होती. पदावर असताना अनियमिततेच्या आरोपाखाली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. शासनाकडून २३ जानेवारी रोजी याबाबत आदेश देण्यात आला होता. सीआरझेड व नगर विकासाबाबतचे अहवाल देशपांडे यांना माहिती असतानाही त्याच्याकडे कानाडोळा करून २०१७ मध्ये त्यांनी रिसॉर्टच्या कामाला परवानगी दिल्याचा आरोप आहे.
दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार केला जात आहे. साई रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप करून बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष इत्यादी तक्रारी नमूद करून सोमय्या यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परब यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला होता.
हेही वाचा >>> दिवा – रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल
मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. दरम्यान याप्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यापूर्वी ईडीने याप्रकरणी सदानंद कदम यांना अटक केली होती. कदम माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.