वर्षभरात डेंग्यूचे ६९८ रुग्ण आढळल्याचे महानगरपालिका सांगत असतानाच शहरातील ३७ प्रमुख रुग्णालयांत केवळ ऑक्टोबरमध्ये ६१५ रुग्ण असल्याचे पालिकेनेच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुंबईत खासगी रुग्णालयांची संख्या दीड हजाराहून अधिक असताना डेंग्यू रुग्णांची संख्या अनेक पट अधिक असू शकते.
डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याविषयी आरोग्य क्षेत्रात चर्चा होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र डेंग्यू रुग्णांची वर्षभरातील संख्या एक हजाराहून कमी असल्याचे वारंवार सांगितले. जून महिन्यापासूनही पालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार डेंग्यू रुग्णांची संख्या ५००हून अधिक झाली नव्हती. मात्र पालिकेचा हा दावा पालिकेच्याच प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेल्या आकडेवारीवरून शंकास्पद ठरला आहे.
मुंबईतील ३७ प्रमुख रुग्णालयांमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे तब्बल ६१५ रुग्ण आढळले असल्याचे पालिकेने मंगळवारी प्रसिद्ध केले. शहरातील नर्सिग होम तसेच रुग्णालयांची संख्या सुमारे १५०० आहे. त्यावरून शहरातील डेंग्यू रुग्णांची संख्या कितीतरी पट अधिक असू शकेल.
‘पालिकेकडून देण्यात आलेली आकडेवारी ही डेंग्यू निश्चित झालेल्या रुग्णांची आहे. डेंग्यूसाठी अनेक चाचण्या आहेत. पालिका त्यातील सर्वात खात्रीशीर चाचणी पूर्ण झाल्याशिवाय डेंग्यू निश्चित मानत नाही. खासगी रुग्णालयातील डेंग्यू रुग्णांची संख्या ही संशयित रुग्णांची आहे’, असे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी सांगितले.
डेंग्यू रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती श्रीमंत वस्तीमधील घरांमध्येही आढळली आहे. तेव्हा डेंग्यूच्या उच्चाटनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे महापौर सुनील प्रभू म्हणाले.  
डेंग्यूचा बारावा बळी
विक्रोळी पार्क साइट येथे राहणाऱ्या वासिम शेख या अठरा वर्षांच्या तरुणाचा डेंग्यूने मंगळवारी मृत्यू झाला. त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूमुळे मृत्यू पावणारा हा बारावा रुग्ण असून ऑक्टोबरमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर गेली आहे.