बेस्टच्या वडाळा आगार नृत्यप्रकरणी कारवाई करण्यात आली असून मराठी अभिनेत्री माधवी जुवेकरसहित सात कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. अंतर्गत राजकारणातून ही कारवाई झाली असून जे घडलं त्यात गैर काहीच नव्हतं अशी प्रतिक्रिया माधवी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी मी निर्दोष असून दुसऱ्या समितीपुढे दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दसऱ्यानिमित्त वडाळा आगारमध्ये आयोजित कार्यक्रमात डान्स करत असताना नोटांची उधळण करण्यात आली होती. यावेळी माधवी जुवेकर तोंडात नोटा धरुन नाचताना दिसत होत्या. कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडताना माधवी म्हणाल्या की, ‘दसऱ्याच्या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम वडाळा डेपोत सादर झाले. यावेळी देशभरातील विविध नृत्यशैली अशी संकल्पना घेण्यात आली होती. गरबा, जोगवा असे विविध नृत्यप्रकार कर्मचाऱ्यांनी सादर केले होते. कच्छी नृत्य करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या नृत्य प्रकारात महिला तोंडात पैसे धरून कमान करतात, त्याप्रमाणे मी खोट्या नोटा तोंडात धरून डान्स केला. त्यात गैर असं काहीच नव्हतं. कोणीतरी जाणूनबुजून बाकीची नृत्य वगळून केवळ आक्षेपार्ह वाटणारा भाग व्हायरल केला होता. पण मी निर्दोष आहे. बडतर्फीच्या कारवाईमागे अंतर्गत राजकारण नक्कीच आहे. त्या कार्यक्रमात उधळलेल्या नोटा या खोट्या होत्या आणि कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे.’
माधवी जुवेकर बेस्टमध्ये लिपिक पदावर कार्यरत होत्या. चौकशी समितीने कारवाई करत सात जणांना बडतर्फ केलं असून पाच जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस केली आहे.
काय आहे प्रकरण?
२९ सप्टेंबर २०१७ रोजी दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माधवी जुवेकरसह बेस्टमधील काही कर्मचाऱ्यांनी नृत्य केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे बेस्टचे कर्मचारी आर्थिक विवंचनेत असून संप करत आहेत, तर दुसरीकडे अशाप्रकारे बेस्ट डेपोमध्येच नोटा उधळल्या जात आहेत याबाबत सर्वसामान्यांनी चीड व्यक्त केली होती. पण व्हिडिओमध्ये उधळलेल्या नोटा या खोट्या असल्याचे माधवीने प्रसारमाध्यमांना सांगितले होते.