मुंबई : आम्ही सत्तेत असताना आम्हाला ‘स्थगिती सरकार’ म्हणणारेच आज ‘स्थगिती सरकार’ झाले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी लगावला. स्वयंसेवी संस्थांनी रविवारी सकाळी आरे कारशेडविरोधात ‘आरे वाचावा’ आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.
कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ते पुन्हा आले तर आम्हीही पुन्हा आलोय, असे म्हणत आरे वाचवा आंदोलन तीव्र करण्यात आले असून त्यानुसार दर रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारच्या आंदोलनात सहभागी होत आदित्य यांनी नव्या सरकारवर टीका केली.
महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या विकासासाठी हाती घेतलेले प्रकल्प रद्द करण्यात येणार आहेत. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आमचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प आहेत. त्यांना स्थगिती देत आता हेच सरकार स्थगिती सरकार बनले असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला.
कांजूरची जागाच योग्य!
कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. येथे एकाच ठिकाणी चार कारशेड करता येतील. त्यामुळे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.