मुंबई : मुंबईतील मालाड येथील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर होणारी धूप रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने हाती घेतलेल्या समुद्री भिंतीचे बांधकाम राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने थांबविले. समुद्री भिंतीचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या समुद्री भिंतीचे बांधकाम करताना महाराष्ट्र तटीयक्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी) नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून तिचे बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मालाड येथील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मागील काही वर्षांपासून अक्सा समुद्रकिनाऱ्याची धूप होत आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर समुद्री भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या समुद्री भिंतीचे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, सागरी किनाऱ्यालगत समुद्री भिंत बांधणे अपेक्षित होते. मात्र मेरिटाईम बोर्डाने किनाऱ्याच्या मध्यभागी समुद्री भिंतीचे बांधकाम सुरू केले. यामुळे या भिंतीच्या दोन्ही बाजूला समुद्रकिनारा आहे.
हेही वाचा – धारावी ‘टीडीआर’च्या बदल्यात एफएसआयवरील निर्बंध हटवा! विकासकांची मागणी!
हेही वाचा – चेंबूरमधील पर्यायी रस्त्याचे बांधकाम रखडले, वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटील
नियमांचे उल्लंघन करून समुद्री भिंत बांधण्यात आल्याचा आरोप करीत काही पर्यावरणतज्ज्ञांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दखल घेतली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत मेरिटाईम बोर्डाने ‘सीआरझेड १’ मध्ये बांधकाम केले आहे. वाळूमध्येच समुद्री भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे, असे नमुद करीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने समुद्री भिंतीच्या बांधकामाला स्थगिती दिली. मात्र समुद्री भिंतीचे बांधकाम नियमानुसार करण्यात आल्याचा दावा मेरिटाईम बोर्डाने केला आहे. दरम्यान, पुढील महिन्यात याप्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे.