लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून ३० वर्षीय तरूणाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला. यावेळी आरोपीने तिच्या मित्रावरही हल्ला केला. दोघांनाही व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरूणी उर्वी रावल (३१) ही कार्यक्रम आयोजन क्षेत्रात काम करते. तिचा मित्र फराज अन्सारी (३५) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गेली होती. यावेळी अन्सारीची मैत्रीण शाझिया खान (तक्रारदार), रावल आणि तिचा मित्र रिफाकत वडगामा आणि इतर उपस्थित होते.
शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अन्सारी याचा वाढदिवस साजरा केल्यानंतर रावल व इतर मंडळी होलीक्रॉस कम्युनिटीजवळ फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी मुंब्रा येथे राहणारा रावलचा प्रियकर समीर शेख तेथे आला.
आणखी वाचा-‘मोका’ वादळामुळे राज्यात पावसाचा इशारा, मुंबईकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता
शेखने रावलला मारहाण केली, तिचा फोन हिसकावून घेतला आणि वडगामाकडे बोट दाखवत तो कोण आहे, असे विचारले. रावलने त्याला उत्तर देत वडगामा तिचा मित्र असल्याचे सांगितले. यानंतर शेखने तिला शिवीगाळ केली, चाकू काढला आणि रावलवर हल्ला केला. वडगामाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेखनेही त्याच्यावर हल्ला केला. नंतर शेख घटनास्थळावरून पळून गेला, असे शाझिया खानने तक्रारीत म्हटले आहे.
शाझिया आणि तिच्या इतर मित्रांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शाजियाच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी समीर शेखविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. रावल दुसऱ्या तरूणाला भेटते, या संशयावरून गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी शेख तिच्याशी भांडत होता, असे रावलने सांगितल्याचे शाझियाने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.