मुंबईतील टॅक्सी-रिक्षांचे मृत परवाने (डेड परमीट) त्वरित देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा संघटनेने १५ जून रोजी रिक्षा-टॅक्सी बंदचा इशारा दिला आहे. मात्र अन्य रिक्षा-टॅक्सी संघटनांनी मात्र या बंदला पाठींबा नसल्याचे जाहीर केले आहे. नूतनीकरण न झालेल्या रिक्षा-टॅक्सींचे परवाने मृत घोषित केले जातात. अशा परवान्यांची संख्या काही हजारांमध्ये असून हे परवाने त्वरित दिल्यास रिक्षा आणि टॅक्सींची संख्या वाढू शकेल, असा दावा स्वाभिमान संघटनेचे नेते के. के. तिवारी यांनी केला आहे. या संदर्भात मंगळवारी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांची भेट घेण्यात येणार असून १५ जून रोजी एक दिवसाचा बंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्वाभिमान संघटनेचे १२ हजार रिक्षाचालक तर १० हजार टॅक्सीचालक सदस्य असून ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
दरम्यान, स्वाभिमानची मागणी योग्य असली आणि त्या तिला आमचाही पाठींबा असला तरी १५ जूनच्या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियन आणि मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने स्पष्ट केले आहे.