राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने उभारणारे खासदार राजू शेट्टी अखेर भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीत मंगळवारी सामील झाले. शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील घटक पक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाशी मैत्रीच्या वाटेवर असताना शेट्टी यांना महायुतीकडे वळविण्यात ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना यश मिळाले. काँग्रेस आणि विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मोठी ताकद असलेल्या शेट्टी यांच्या समावेशामुळे महायुतीला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागा वाढतील, असे मुंडे यांनी सांगितले.
शेट्टी यांच्या महायुतीतील समावेशासंदर्भात मुंडे, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, शिवसेनेचे गजानन कीर्तीकर, लीलाधर डाके आदी समन्वय समितीच्या नेत्यांची चर्चा झाली. भाजप अध्यक्ष राजनाथसिंह, सुषमा स्वराज आदी केंद्रीय नेत्यांशी मुंडे यांनी बोलणी केली होती. केंद्रात सत्ता आल्यास शेतीमालाच्या किंमतीसंदर्भातील डॉ. स्वामीनाथन, ऊस, साखरेबाबत डॉ. रंगराजन समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारल्या जातील, दुष्काळ निवारणाबाबत स्वतंत्र प्राधिकरण किंवा आयोग स्थापन केला जाईल, अशा मागण्या शेट्टी यांनी केल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाने त्याला हिरवा कंदील दाखविल्यावर शेट्टी यांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला.  
लोकसभेसाठी दोन जागा
शेट्टी यांचा हातकणंगले आणि माढा हे मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेसाठी सोडण्याचे भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी ठरविले आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या वाटय़ाची प्रत्येकी एक जागा सोडली असून आता शिवसेना २१ व भाजप २५ जागा लढविणार आहे. विधानसभा निवडणुकीत किती जागा सोडायच्या, याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून महायुतीच्या समन्वय समितीची बैठक १४ जानेवारीला होणार आहे.
मनसेचा विचार नाही : महायुतीत किंवा आघाडीत आणखी पक्षांचा व संघटनांचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी मनसेबाबत कोणताही विचार नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. शेतकरी कामगार पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, आमदार अनिल गोटे आदींना महायुतीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेट्टी यांची पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात चांगली ताकद असून महायुतीला किमान २०-२२ मतदारसंघात त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
(छायाचित्र – देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर अकाऊंटवरून साभार) 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा