‘स्वदेस फाऊंडेशन’ची स्थलांतरित तरुणांसाठी नवउद्यमी साद; पाच वर्षांत १० लाख गावकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे लक्ष्य
रायगड परिसरातून अधिक पैसे कमाविण्याची मनिषा बाळगत नजीकच्या मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या अनेक तरुणांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी आणण्यात मिळालेले यश. आणि शहराइतकेच मासिक उत्पन्न शिवाय स्वत:चा व्यवसाय ही तरुण गावकऱ्यांची परतावारूपी गुंतवणूक..
सामाजिक कार्याकरिता मुहूर्तमेढ रोवलेल्या स्वदेस फाऊंडेशनने कालानुरूप आपले कार्यक्षेत्र अधिक विसारित करताना विविध कारणास्तव चर्चेत असलेल्या स्थलांतराच्या मुद्दय़ावर काम करणे सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. स्वदेस फाऊंडेशनने जून ते सप्टेंबर दरम्यान परिसरात ११ समिती बैठका घेतल्या. त्यात १,२५० जण सहभागी झाले होते. पैकी २५५ स्थलांतरितांनी पुन्हा गावाकडे येण्याची तयारी दर्शविल्याची माहिती संस्थेच्या प्रवकत्याने ‘लोकसत्ता’ला दिली. मुंबईत असलेल्या रायगडवासींयांच्या २०० हून अधिक मंडळामार्फतही तरुणवर्ग गावातील रोजगार संधीबाबत चाचपणी करत असल्याचे सांगण्यात आले.
सिने निर्माते-दिग्दर्शक रॉनी स्क्रुवाला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वदेस फाऊंडेशनने रायगड जिल्ह्य़ातील महाडमध्ये पाय रोवले आहेत. रायगडच्या सहा विभागात स्वदेसचे कृषी रोजगार, उद्योगाद्वारे आर्थिक स्वावलंबनासह शिक्षण, आरोग्य असे कार्य आहे. यामार्फत १.१० लाख घरटय़ांपर्यंत संस्था पोहोचली आहे. याशिवाय अपारंपरिक शेतीतून निलेश जाधव या स्थानिकाला नियमित उत्पन्नाची संधी स्वदेसच्या सहकार्यातून उपलब्ध झाली आहे. महाड ते महाड द्वारा मुंबई-पुणे असा रोजगारासाठी प्रवास करत पाच ते सहा वर्षे व्यतीत करणाऱ्या धोंडीराम शेडगे याने कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून परिसरातील या बाजारपेठेवर ताबा मिळविला आहे. गावातील आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या वैशाली काळगुडे या परिसरातील तज्ज्ञ परिचारिका बनल्या आहेत. मधुकर पोटे या अंपग तरुणाने सहकारी भागीदारांबरोबर काजू प्रक्रिया केंद्र स्थापन करून मुंबईतील प्रमुख व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा पुरवठादार उद्योजक म्हणून यश मिळविले आहे.
नाबार्डच्या नाबार्ड फायनान्शिअल सव्र्हिसेस या उपकंपनीद्वारे स्वदेसच्या माध्यमातून रायगड परिसरातील नव उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध केले जाते. प्रत्येक पाच वर्षांत १० लाख ग्रामीण भारतीयांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दीष्ट स्वदेस फाऊंडेशनने राखले आहे. कृषी आधारित व्यवसाय तसेच रोजगाराच्या जोरावर वाळवण गावातून जाणाऱ्या काळ नदीच्या किनाऱ्यावरील एकगठ्ठा ५० एकर शेती पट्टय़ांमध्ये (क्लस्टर) तरुणांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया स्वदेसने सुरू केली आहे. त्याचबरोबर या परिसरात नदीवर तीन बंधारे विकसित करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भारताचे प्रारूप विकसित करणे हेच स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य ध्येय आहे. योग्य विचार आणि त्यानुसार केलेली कृती याद्वारे ग्रामीण भारतात तशी संधी उपलब्ध करून देणारे वातावरण तयार होऊ शकते. अशा वातावरण निर्मितीत सहभागाचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे सहभागींचा केवळ आर्थिक विकासच होत नाही तर त्यांच्या आरोग्य, शिक्षण असा विविधांगांनी विस्तार होतो. आमच्या या प्रयत्नामुळे रायगडबाहेर गेलेले अनेक तरुण पुन्हा त्यांच्या मूळ गावी स्थिरावत असून ते आता सक्षम आयुष्य जगत आहेत.
– झरिना स्क्रुवाला, संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त, स्वदेश फाऊंडेशन.