स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या.
निर्मलाताई यांचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यावर निर्मलाताईंनी त्यांच्या कामात हातभार लावला. स्वाध्याय परिवारामध्ये निर्मलाताईंचेही मोलाचे योगदान होते. स्वाध्याय परिवरातील सदस्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. पांडुरंगशास्त्री यांच्या निधनानंतर निर्मलाताई या ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठात राहत होत्या. निर्मलाताई यांच्या निधनाने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.
निर्मलाताई यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. बुधवारपर्यंत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती स्वाध्याय परिवाराकडून देण्यात आली आहे.