मुंबई : विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथ-देखावे, पारंपरिक पेहरावातील युवकांची उत्साही गर्दी, लेझीम पथक व ध्वज पथकांची लगबग आणि ढोल-ताशांच्या गजराने गुढीपाडव्यानिमित्त मुंबईनगरी दुमदुमली होती. गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, सातरस्ता, विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली आदी विविध ठिकाणी स्वागतयात्रांचा जल्लोष पाहायला मिळाला.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील विविध शोभायात्रा ‘मराठी भाषेचा जागर आणि मायमराठीच्या अभिजाततेचा गौरव’ या संकल्पनेवर आधारित होत्या. गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची नववर्ष स्वागतयात्रा म्हणजेच प्रसिद्ध ‘गिरगावचा पाडवा’ हा यंदा ‘मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात’ संकल्पनेवर आधारित होती. या अनुषंगाने साकारण्यात आलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. स्वागतयात्रेत पन्नासहून अधिक कलाकृती आणि चित्ररथ होते. यंदाही पारंपरिक पेहरावातील दुचाकीस्वार युवतींचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगाव कलामंचतर्फे संस्कारभारती रांगोळ्या आणि महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राजकीय शक्तिप्रदर्शन
● महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन विविध राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्यांनी, तसेच पदाधिकाऱ्यांनी यावेळी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली.
● मुंबईतील विविध ठिकाणच्या स्वागतयात्रांत स्थानिक राजकीय नेतेमंडळींनी नागरिकांमध्ये मिसळणे अधिक पसंत केले.