Swami Avimukteshwaranand on Uddhav Thackeray : बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर उपस्थित होते. या भेटीनंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीमागचे कारण सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचे सांगून दुःख व्यक्त केले. उद्धव ठाकरे लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होवोत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवोत
“आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पूण्य-पापाची कल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचे बोलले गेले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावना यावेळी मी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचा >> राम मंदिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे शंकराचार्य कोण आहेत? शंकराचार्यांची परंपरा कधी सुरू झाली?
विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाहीत
“कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल. जो विश्वासघात करतो, तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो, तो हिंदूच असणार. कारण त्याच्याशी विश्वासघात झाला आहे. ज्या लोकांनी विश्वासघात केला, ते हिंदू असू शकत नाहीत”, असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यावेळी म्हणाले.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला, हे आता लोकसभेच्या निकालातूनही स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या जनतेनेही मतदानाच्या माध्यमातून हे दाखवून दिले. ज्यांनी विश्वासघात केला, त्यांनी जनतेच्या मताचाही अनादर केला होता. सरकारला मध्येच फोडायचे आणि जनतेच्या मताचा अनादर करणे, हे योग्य नाही.”
हे ही वाचा >> चमत्कार करुन जोशीमठची दुभंगलेली जमीन जोडून दाखवा; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान
मी शंकराचार्य असलो तरी..
तुम्ही शंकाराचार्य असून राजकारणात का पडता? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “मी शंकराचार्य असलो तरी जे सत्य आहे, तेच मी बोलणार. हिंदू धर्मातही पाप-पूण्य या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. राजकारणाशी माझे देणे-घणे नाही. पाप-पूण्य हे धर्माशी निगडित आहे. त्यामुळे या विषयावर आम्ही भाष्य नाही करायचे तर कुणी करायचे?, असे प्रत्युत्तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दिले.