मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद तलावातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून स्वच्छतेच्या अभावामुळे तलावात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या तलावातच नागरिक कचरा भिरकावत असून त्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या, माशांना खाण्यासाठी टाकण्यात येणारे अन्नपदार्थ आदींचा समावेश आहे. त्यामुळे तलाव प्रदूषित झाला आहे.

तलावात होणारे प्रदूषण रोखा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होऊ लागली आहे. पिशवीतील कचरा, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, अन्नपदार्थ तलावात भिरकावणाऱ्या नागरिकांवर कारवाई होत नसल्याने कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, तलावातील पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवा थर साचलेला दिसत आहे. शेवाळ व जलपर्णीमुळे पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. तसेच दूषित तलावामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तलावात फेकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजारांसाठी योग्य वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तलावातील अतिरिक्त पोषक तत्वांमध्ये नील हरित शैवालाचा प्रसार होऊन परिणामी एकपेशीय वनस्पतींची जलद वाढ होते. त्यामुळे केवळ जलचरांनाच नाही तर, परिसरातील प्राणी आणि नागरिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

हेही वाचा – करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ३७ नवे रुग्ण

हेही वाचा – आरबीआयसह ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी-ईमेल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

गेले अनेक दिवस तालावाची दयनीय अवस्था झाली आहे. तलावाच्या परिसंस्थेचा आणखी ऱ्हास टाळण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. – गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन

Story img Loader