लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘कोणत्याही चित्रपटाचे बलस्थान ही कथा असते. बाकी सर्व कलाकार व तंत्रज्ञ हे कथेचे वाहक असतात. तर चालक हा दिग्दर्शक असतो. त्यामुळे जर तुमची कथा दर्जेदार असेल, तरच चित्रपट यशस्वी होतो. पुढील गोष्टी या प्रवाहाच्या भरात येत राहतात’ असे सांगत कथा महत्त्वाची, कलाकार दुय्यम अशी भूमिका अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी घेतली.
चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक महत्त्वाचे असते, कलाकार कोण आहेत या गोष्टी नंतर येतात. जेव्हा चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावते, तेव्हा चित्रपट निश्चितच यशस्वी होतो, असे स्पष्ट मत अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी त्यांच्या आगामी ‘जिलबी’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात व्यक्त केले. गोड आणि गूढ कथेचे मिश्रण असलेला उत्कंठावर्धक ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट १७ जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित आणि नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका यात आहेत. महेश चाबुकस्वार हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या सोहळ्यात मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
आणखी वाचा-गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य, उच्च न्यायालयाची टिप्पणी
‘मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. तहानभूक विसरून आणि दिवसरात्र मेहनत करून पत्रकार बांधव हे कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, याबद्दल पत्रकारांचे आभार. ‘जिलबी’सारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणे, हे नटाचे भाग्य आहे. मला वेगळे काम करण्याची खूप इच्छा आहे, पण वेगळे काम करण्याची संधी मिळणे, महत्वाचे असते. ती संधी मला मिळाली, याचा आनंद आहे’, असे स्वप्नील जोशी यांनी सांगितले. तर ‘खंबीर निर्माते हे दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिल्यास प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळेल’, असे मत प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.